top of page

किरण - शब्दचित्र

सूर्यवलय

 

वाणीतले अक्षरगीत तुझे

होऊ दे तृप्त आमचे कान

शब्दांतले लावण्यतेज तुझे

हलकेच चित्त मुक्त ते रान

रवीकरांचे नादपंख ते तुझे

संपवे तमास तुझीच तान

नवदीप देखणे उजळ तुझे

राजश्री मंगल श्वेतात शान

झेपणे गरूड भरारी तुझे

यशदेचे लोभस सुरेल गान

बुद्धी प्रज्ञा की यात्रिक तुझे

कोण क्षेत्र उरले कोण मान

उपाधी झालेत भाविक तुझे

श्रमसार्थक सत्यनाद महान

वळणेच जाहलीत मार्ग तुझे

अमृतात नाहते नीरक्षीर पान

मोदात अखंड धाडस तुझे

चिरंजीव सारे ते पायसदान

सफल सुखानंद लाभ तुझे

वर्धिले सुफळ ऐश्वर्य सन्मान

सूर्यवलयी सुंदर निरभ्र तुझे

लखलखते हेम किरण

 

जीवनातील प्रत्येक वळणावर असेच

सूयश सतत लाभू दे हीच सदिच्छा

 

सौ. नीलिमा फाटक

 

२१/०१/२०२२

इराणी सिनेमांप्रमाणे रूपकांचा, प्रतीकांचा सूचक वापर केल्यामुळे 'अनामिकाची विचारधून' ही कादंबरी वाचताना आपण रंजकता आणि उत्सुकता यांची जुगलबंदी अनुभवत आपोआप कथानकाच्या वातावरणात शिरतो, रमतो आणि आपल्या स्वतःच्या जगातलाच एक अनपेक्षित

साक्षात्कार घेऊन बाहेर पडतो. कोणत्याही सशक्त लेखकाचं स्वप्न असतं की, त्याच्या कलाकृतीमधील आशय, विषय, शैली आणि कल्पकता हे सर्व पैलू एकमेकांना समर्पक असावेत आणि त्यांनी एकत्रितपणे त्या निर्मितीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवावं. या सर्व बाबतीत ही कादंबरी सरस ठरते. प्रशासनातील गुंतागुंत सर्वाच्याच मनावर, आयुष्यावर आणि विचारपद्धतीवर कशा प्रकारे परिणाम करू शकते हे लेखकानं यशस्वीरीत्या दाखवलं आहे. एखादा विषय अत्यंत जवळून जाणला असला, एखादी कार्यपद्धती आतून-बाहेरून अनुभवली असली की काय सांगावं आणि काय सोडावं हा सहज न सुटणारा पेच निर्माण होऊ शकतो; पण त्याचे नाजूक, कलात्मक संतुलन इथं लीलया साधलेलं दिसतं. या धाडसी प्रयोगाची तुलना फ्रान्झ काफ्का, इतालो काल्वीनो, पॉल ऑस्टर आणि जॉन फॉसे यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या अशा प्रकारच्या अन्य प्रयोगांशी करता येईल. काही तरी मोलाचं सांगायला, एवढा मोठा कलासागर पोहून, लेखक आला आहे तर त्याला भेटण्यासाठी, त्याच्या गोष्टीचा नीट आस्वाद घेण्यासाठी वाचकांनीसुद्धा त्या पाण्यात उतरायला हवं. अर्थात चित्त विचलित होऊ न देता, पुरेसा वेळ देऊन रसग्रहण करायला हवं.

चेतन जोशी

इंग्रजी लेखक

प्रकाशकाच्या नजरेतून

     "ब्लॅक आणि व्हाइट या दोन टोकांमध्ये अनेक रंगांच्या शेड्स असतात आणि त्यादेखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, असे त्याला वाटे. भडक जे असते, ठसठशीत असते. त्याचेही काही सौंदर्य असते; पण फक्त तेवढेच सुंदर असते, हे त्याला मान्य नव्हते. असे असले तरी, अनेक कारणांमुळे एखाद्या चित्रातले बारकावे आणि शेड्स याच्यापेक्षा ठळक रंगांवरच मूल्यमापन करावे लागते, हे त्याच्या अंगवळणी पडले होते. असे करण्यामागची कारणे 'सिच्युएशनल' असतात आणि सिच्युएशन ठरवणारा गव्हर्निंग फॅक्टर कोणता असतो, ह्याबद्दल त्याचे ठाम मत होतेच. ते म्हणजे सिच्युएशन ठरवणारा गव्हर्निंग फॅक्टर म्हणजे मतलबाच्या रथाचा घोडा!", असं वाटणारा हा 'कुणीतरी १' .

‘कुणीतरी १′ हेच ‘अनामिकाची विचारधून' या पुस्तकाचं मध्यवर्ती पात्र. हे लिंग, भाषा, जात, धर्म, देश, प्रांत, सजीव, निर्जीव, स्थळ, काळ, वेळ आणि पार्श्वभूमी या सगळ्याच्या पलीकडचं पुस्तक आहे. कोणत्याही संदर्भामध्ये आणि संदर्भांच्या वर्णनामध्ये न अडकलेली ही गोष्ट संदर्भाच्या आणि त्यांच्या वर्णनाच्या पलीकडे जाऊ पाहणारी आहे आणि हेच या पुस्तकाचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळे कुठेही विशेष नामांचा वापर न करता कुणीतरी १, प्रॉडक्टव्यक्ती... अशी किती तरी सर्वनामे पुस्तकात येतात.

काही तरी एक सूत्र घेऊन लिहिलेलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे 'अनामिकाची विचारधून'. रूढार्थानं ती एक कादंबरी असली तरी त्यात साहित्याचा हर एक प्रकार लीलया वापरला गेला आहे. कथा सांगणं, दीर्घ कवितांचा चपखल वापर, अधूनमधून केलेलं समर्पक निवेदन, मुलाखती, शैलीत असलेली सूक्ष्म विनोदी झालर, उपरोधाचा केलेला चपखल वापर ही या पुस्तकाची सहज नजरेत भरणारी वैशिष्ट्यं. लेखकानं विचारपूर्वक विचारांवर काम केलं आहे. विचार ही मानवी अस्तित्वाची मूलभूत अट आहे. विचारांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती सर्वात मोलाची गोष्ट आहे, असं जेव्हा लेखक म्हणतो तेव्हा आपणही विचार करायला लागतो.

या कादंबरीला फक्त वैज्ञानिक किंवा राजकीय असा शिक्काही मारून चालणार नाही, कारण यात या दोन विषयांसह इतिहास, कायदा, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, शिक्षण, अध्यात्म, तुलनात्मक विश्लेषण, संतविचार, सामाजिकशास्त्र, निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा झगडा अशा नानाविध विषयांना स्पर्श केला आहे. सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येला लेखकानं दिलेला छेद, प्रचलित शिक्षणाबरोबरच नव्या योग्य शिक्षणपद्धती आत्मसात का केल्या पाहिजेत या विषयीचे पुस्तकातले युक्तिवाद महत्त्वाचे आहेत. सर्व स्तरांवर होणारा नैतिकतेचा -हास, इंटरनेटवर माहितीचा विस्फोट, स्त्री-पुरुष असमानता अशा समस्यांवर मार्मिक टीका करतानाही त्यांची भाषा कुठेही अनावश्यकपणे आक्रमक होताना दिसत नाही आणि त्यांची सकारात्मकता तसूभरही कमी होत नाही.

कुणीतरी १ हे पुस्तकाचं मध्यवर्ती पात्र ज्या काळजीनं आणि मेहनतीनं बेतलं आहे त्याला तोड नाही. लेखक भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी तर आहेतच; पण ते एक प्रगल्भ, संवेदनशील, बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या बुद्धीची झेप या प्रत्येक अक्षरात उमटते. विचारांच्या ऊर्जेवर जगणाऱ्या एका प्रामाणिक, पुस्तकातल्या धाडसी, कणखर अधिकाऱ्याची तळमळ या पुस्तकातून व्यक्त झाली आहे. ही तळमळ देशाच्या सुजाण नागरिकाचीही आहे.

कुणीतरी १ आणि इतर अनेक पात्रांमध्ये लेखकाच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली दिसते. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून काम करणारा हा अधिकारी व्यवस्थापनशाही, व्यवस्थेतली उतरंड, त्यामुळे होणारी गटबाजी, स्वार्थी जग यातूनही इच्छा असेल तर मार्ग निघू शकतो, असं सांगतो. वर्षानुवर्षं प्रशासनात तटस्थ वृत्तीनं काम करत असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात नेहमी एक जबाबदारी आणि खबरदारी दिसते. इतक्या वर्षांचं सगळं मनात साठलेलं कागदावर उमटवताना ते स्थितप्रज्ञता आणि संयम सोडत नाहीत.

'अनामिकाची विचारधून' या कादंबरीच्या नावातच सुरू झालेला सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहतो. यंत्रणेत जी आहे ती परिस्थिती यात राहूनही प्रत्येकाला विचारपूर्वक, बुद्धी वापरून, धडपड करून विधायक कामाचं लक्ष्य कसं गाठता येतं याचा परिपाठ या पुस्तकानं घालून दिला आहे. विचार करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक अर्पण करताना लेखक 'व्यक्ती ते समष्टी' हा एक विचार देतो. जगात काही चांगलं काम करायचं असेल तर चांगल्या विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येऊनच पुढे जावं लागेल हा धागा त्यात दिसतो -

विज्ञानात न्हालेला माणूस 'मी' पणापेक्षा 'आपण' पणावर जास्त प्रेम करतो आणि मला वाटते, मी तसाच 'आपण' पणावर अधिक प्रेम करणारा माणूस आहे. माझी 'आपण' ची व्याख्या मात्र इतर अनेकांपेक्षा वेगळी आहे, व्यापक आहे. ती कुठल्याही एका समाजघटकाशी निगडित नाही. ती भाषा, प्रांत, धर्म, पंथ कश्शाकश्शाशी मुळीच निगडित नाही. मी विश्वाचा नागरिक आहे. माझे नाते केवळ भू-गोलाशी नाही, तर ख-गोलांशी आहे.

निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण ही पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. पुस्तकात घोडा, चिमणी, कुत्री यासह निसर्गातल्या अनेक प्रतिमांचा सुरेख पद्धतीनं वापर ठायी ठायी आहे. त्याही पलीकडे जाऊन सजीवांप्रमाणे निर्जीवांचे विचारही त्यात आले आहेत.

त्याचे एक बोलके उदाहरण-

अंगणातले गुलमोहराचे झाड कुंपणाच्या कानाशी कुजबुजू लागले.

झाडावरच्या

कोकिळेने आपल्या साथीदाराला अंगणातल्या सळसळत्या उत्साहाबद्दल तेवढ्याच उत्साहाने सांगितले. घराच्या भिंती तो उत्साह पाहून मोहरून गेल्या. छोट्या विश्वाच्या नायकाचा उत्साह संसर्गजन्य झाला. छोट्या विश्वातले सारेच सजीव- निर्जीव उत्साहाने सळसळू लागले. वाऱ्याच्या झुळकीला कोकिळेच्या गाण्याने निरोप पोहोचवला. खारुताईने झुबकेदार शेपटी उभारली आणि छोट्या विश्वाच्या नायकाशी वेगाची स्पर्धा सुरू केली.

आता प्रकाशक म्हणून सदामंगल पब्लिकेशननं हे पुस्तक का छापलं याकडे येऊ या. सदामंगल पब्लिकेशन सुरू होऊन जेमतेम सात वर्षं झाली आहेत. पुस्तकं निवडताना दर्जा आणि विविधता राखण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच केला आहे. हे पुस्तकंही याला अपवाद नाही. लेखकानं अनेक प्रकाशन संस्थांच्या पर्यायांची चाचपणी करून सदामंगल पब्लिकेशनची गुणवत्तेच्या निकषावर निवड केली यात संस्थेचं यश आहे. एका चांगल्या व्यावसायिक ( धंदेवाईक नाही) प्रकाशकाचा कल नेहमी मोठा खप होऊ शकेल अशी पुस्तकं छापण्याकडे असतो. दर्जेदार निवडीला हे पुस्तकही अपवाद नाही.

‘अनामिकाची विचारधून' हे पुस्तक समजायला अवघड आहे का ? बुद्धिजिवींसाठीच ते फक्त लिहिलं आहे का? ते पूर्ण वाचलं जाईल का ? असे अनेक प्रश्न हे पुस्तक तयार होताना आमच्या मनात आले. या चौकटीपलीकडे जाऊन आम्ही काही वेगळा विचार केला तो असा - सामान्य माणसाला समजायला पुस्तक कठीण वाटेलही; पण सामान्य माणूसही विचार करतोच की. फक्त त्याची व्यक्त होण्याची पद्धत तथाकथित एलिट ग्रुपपेक्षा वेगळी असते, कारण त्याच्या वैचारिक समस्या वेगळ्या असतात, सामाजिक चौकट भिन्न असते. थोडक्यात, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पातळीवर विचारांचा झगडा करतच असतो आणि हे विचारच कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत.

उशीर कधीच झालेला नसतो. मनात लख्ख प्रकाशाचा क्षण चमकला, हे महत्त्वाचे! त्याच्या प्रकाशात पुढची वाटचाल महत्त्वाची. शंभराव्या घावाने दगड फुटला म्हणजे पहिले ९९ घाव वाया गेले, असे म्हणायचे का? मुळीच नाही. आयुष्यातले आधीचे सारे क्षण ह्या एका लख्ख क्षणाकडेच कणाकणाने नेत होते, हेच खरे!, असं लेखक एके ठिकाणी म्हणतो. असे अनेक उतारे बुद्धीला लागलेला गंज खरवडून मार्गदर्शकाचं काम करतात. आपण खडबडून जागे होतो..

या पुस्तकाला अनेक आयाम आहेत. प्रत्येकाला त्यातल्या वेगवेगळ्या बाजू दिसतील. प्रत्येक जण या पुस्तकाकडे याच व्यापक नजरेनं, परिप्रेक्ष्यातून बघेल अशी मला खात्री आहे. दोन सपाट प्लेट्स आणि दोन समतल आरशांमध्ये रंगीत साहित्याचे सैल बिट्स (जसे की काच किंवा प्लॅस्टिक) असलेले एक साधन म्हणजे कॅलिडोस्कोप. तो असा फिरवतात किंवा ठेवतात की सामग्रीच्या तुकड्यांच्या स्थितीतील बदल वेगवेगळ्या अगणित नमुन्यांच्या विविधतेमध्ये परावर्तित होतात. कॅलिडोस्कोपिक वास्तवाची मुळे ग्रीक तत्त्वज्ञानात सापडतात. त्याची व्याख्या अशी, 'A kaleidoscopic reality which speaks of beauty and forms, is a harmony composed of disparate elements, a succession of unified varieties that can take on several aspects depending on the angle of the experience and the moment of the observation.' म्हणूनच कुणाला पुस्तक प्रस्थापितविरोधी वाटेल, कुणाला हुकूमशाही वृत्तीविरुद्ध वाटेल; पण जे पुस्तक वाचतील त्या प्रॉडक्टव्यक्तीला ही कादंबरी आपणच जगलो आहे असं वाटेल, जसं ते मला वाटलं. ‘अनामिकाची विचारधून'नं मराठी साहित्यात खरं तर मोलाची भर घातली आहे आणि त्याची दखल साहित्यिक वर्तुळाला घ्यायला लागेल, कारण असे वेगळ्या प्रकारचे प्रयोग सध्या फारच अपवादानं होतात. अशा महत्त्वाच्या पुस्तकाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिल्याबद्दल किरण कुलकर्णी यांचे मनापासून आभार.

प्रज्ञा जांभेकर

पुस्तकाविषयी अधिक

                ‘अनामिकाची विचारधून' ही अभिनव कल्पना व संकल्पनांनी नटलेली एक कादंबरी आहे. अफलातून याचा कालखंड, पात्रे, स्थळ, कथाशैली व सादरीकरण सर्वच अगदी नावीन्यपूर्ण आहे. खरा राष्ट्रवाद व फाजील राष्ट्रवाद यातील फरक जनतेच्या व शासनकर्त्यांच्या निदर्शनास आणून देणे हा या कादंबरीचा | प्रमुख हेतू आहे. या ठिकाणी जॉर्ज ऑर्वेल या ब्रिटिश लेखकाची आठवण होते. ऑर्वेलच्या '१९८४' व 'अॅनिमल फार्म' या कादंबऱ्या निरंकुश शासन, एकाधिकारशाहीवर फक्त टीका करतात. त्यातून बाहेर येण्याचा मार्ग सुचवत नाहीत. याउलट ही कादंबरी तोडगा देते. विचारांची प्रगल्भता व मराठी भाषेवरील पकड या बाबींचा विचार केला तर ही कादंबरी लेखकाची पहिली कादंबरी आहे असे वाटत नाही.

- डॉ. मुजफ्फर सलीम शेख निवृत्त प्राध्यापक आणि लेखक

पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राण्याचे वेगळेपण केवळ त्याला मिळालेल्या एकाच निसर्गदत्त देणगीमुळे आहे ती म्हणजे त्याची सारासार विचारशक्ती' कादंबरीचा प्रमुख नायक 'कुणीतरी १' वैचारिक स्वातंत्र्याची जाणीव बाळगणारा संवेदनशील मनाचा, सकारात्मक व सुधारणावादी आहे. त्याच्या आणि इतरांच्याही विचारांभोवती फिरणारे कथानक हे या पुस्तकाचं वेगळेपण.

- डॉ. कल्पना भांगे नेत्रतज्ज्ञ आणि साहित्यप्रेमी

वेगवेगळ्या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अभ्यासायला हवे. त्यावर नाट्य प्रयोग- वादविवाद- चर्चासत्रे घडवून आणली जावीत. 'अरे, हे काय? आता पुढे काय होणार ? डेडलॉक झाला की काय ? यापेक्षा आता वेगळे काय असू शकते?' असे पुस्तक वाचताना सतत वाटत राहते आणि नंतर मग 'ऐसा भी होता है!' अशी सहज प्रतिक्रिया येते. यातील पात्रांना चेहरा नसला तरी ती आपल्या विचारांची, आपल्या भावनांची, आपल्या मानसिकतेची उंची वाढवतात. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, वर्गकलह, समता आणि सत्याचा शोध या चार मूलभूत विचारधारांनी या कादंबरीला वैज्ञानिक बाज दिला आहे.

-माधुरी यादवाडकर शिक्षण मार्गदर्शक आणि समुपदेशक

-

बोध आणि रंजन या दोन्हीही चौकटी ओलांडणारे हे लेखन उत्कट अनुभव देते. अद्भुतता आणि वास्तवतेचा अनोखा संगम लेखनात दिसतो. जाणिवेच्या गोष्टी नेणिवेत नेणारी, विचारांना चालना देणारी ही उत्कंठावर्धक गोष्ट आहे. खरे विज्ञान हे मानवाच्या हिताचे आणि विश्वाला विचारप्रधान करणारे तसेच दडपशाहीला नाकारणारे असते, असा संदेश या कादंबरीतून मिळतो.

- नीलिमा फाटक मराठी साहित्य संशोधक

चाकोरीबद्ध चौकटीपलीकडे जात भाषेचा ठसा उमटवणारी कादंबरी आहे. प्राणी व मानव यांच्या मनातील भाव व भावना समजून टिपल्या आहेत आणि प्रगल्भतेने लिखाण केले आहे, तरीही समजण्याजोगी भाषा आहे हे विशेष.

- वासंती देशपांडे वाचनप्रेमी

WhatsApp Image 2024-06-14 at 2.49.07 PM.jpeg

पुस्तक :  अनामिकाची विचारधून !

लेखक : ‍किरण कुलकर्णी

संपादन : प्रज्ञा जांभेकर

प्रकाशक : सदामंगल प्रकाशन, मुंबई

 

            “अनामिकाची विचारधून” ही किरण कुलकर्णी लिखित कादंबरी समकालिन समस्यांबद्दल भाष्य करणारी आहे. अनामिकाची विचारधून मध्ये सत्तेची, व्यवस्थेची, सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या धडपडीची आणि व्यवस्थेविरुध्दच्या संघर्षाची कहाणी आहे. आटपाट नगराऐवजी हे अडपसडप नगर आहे आणि  इथली पात्रे कोणत्याही  जातीपाती, धर्माची ओळख बाळगत नाहीत तर यातील व्यक्तिरेखा आकडयांनी ओळखल्या जातात. एकदा कथानक पुढे गेले की, त्यातील घटनांमध्ये नाव, गाव आणि ओळखीच्याही पलिकडे जाऊन आपण थेट त्या पात्रांच्या तोंडून मांडलेल्या विचारात अडकून पडतो, त्यांच्या चर्चांत  गुंततो कारण   पात्रांमधल्या चर्चा हेच  इथलं घडणं आहे आणि हेच लेखकाला अपेक्षित असावे.
   अनामिकाची विचारधून ही कादंबरी अन्योक्ती पध्दतीने लिहिली आहे. म्हणजे थेट भाष्य कुठेही नाही, कोणतेही पात्र ओळखीचे नाही, ही कादंबरी कुठे घडते याचे बाहय वर्णन पण नाही तरीही ही कादंबरी आपल्या मनात घडत राहते. कुणीतरी 1, प्रॉडक्ट व्यक्ती 1, महाचतुर, विशिष्ट 97, आदी पात्रे डोळयासमोर उलगडायला लागतात. जे परिस्थितीबद्दल सखोल विचार करतात त्यांच्या डोळयासमोर हा पट उलगडला जाऊ लागतो आणि कळत नकळत मतही तयार व्हायला लागते. या  कादंबरीचा काळ हा  वर्तमानातला नाही तर भविष्यात काय घडेल याची चाहूल देणारा आहे. इंटरनेटचा सध्याचा माहितीच्या महाजालाचा काळ संपून ज्ञानाचे  महाजाल तयार झाल्याचा हा काळ असल्याने येथील बहुतांशी व्यवहार हे भौतिक नसून मानवी  मनाच्या  अंतरंगाचा वेध घेणारे आणि माणूस म्हणजे  माणसांचे मानसविश्व असा मानणारा हा काळ आहे.
   अशा या काळात कुणीतरी 1 आणि प्रॉडक्ट व्यक्तीची ही कथा घडते. कोणकोण, कोणीही, कोणीतरी, विशिष्ट, चतुर आणि महाचतुर असे  समाजाच्या उतरंडीमधले गट आहेत आणि या सर्वांचे सेल्फ टॉक्स जाणून घेणे हा कुणीतरी 1 चा छंद आहे. अशा या देशात विचार बदलाच्या प्रकल्पाचे काम चालू आहे. यामध्ये चतुष्पाद हे माणूस नसलेले महत्वाचे पात्रही आहे. अशा  अगदीच वेगळया  प्रतलावर घडणारी ही कादंबरी  वाचताना तुम्ही नकळत  विचारांच्या जगात शिरता व नंतर सर्व प्रकारच्या विचारांची मांडणी करत, विचारांचे संघर्ष होतात. विचारजग कसं बदलतं आणि त्यावर  प्रभाव पाडणाऱ्या किती गोष्टी असतात याची जाणीव व्हायला  लागते. मन नकळत अंतर्मुख होतं व भौतिक दृष्टया स्वतंत्र भासणाऱ्या जगातलं वैचारिक पारतंत्र्य जाणवायला  लागतं. विचारांवर प्रचंड प्रभाव टाकून  आपल्याला हवा तसा बदल घडवणाऱ्या व्यवस्थेशी संघर्ष आपल्याला व्यथित करतो. यावर उपाय  काय म्हणून शेवटपर्यंत तुम्ही कादंबरी वाचत जाता. या कादंबरीतल्या वैचारिक मांडणीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु होतो.
   अनामिकाची विचारधून कादंबरीची रचनाही विलक्षण आहे. रुढार्थाने कोणतीही ठराविक मांडणी ही कादंबरी करत नाही. हया कथा रचनेला कादंबरी म्हणावी का असाही प्रश्न पडावा याप्रमाणे या कादंबरीत मध्येच निवेदन येते, तर कधी मध्येच नाटकासारखे संवाद येतात, कधी नुसतीच कविता येते  तर कधी सभावृत्तांत आणि भाषणे येतात. पण हे सर्व वाचत असताना कथानकाचे सूत्र मात्र बांधून ठेवते.  रुढार्थाने या कादंबरीला कोणत्याही विशिष्ट प्रकारात बसवता येत  नसल्यानेही हा कादंबरीचा प्रयोग विलक्षण झाला आहे.
   एखाद्या  कसलेल्या चित्रकाराने रंग, रेषांवर  प्रभुत्व प्राप्त केल्यानंतर आपल्या चिंतनाला आणि स्वैर विचारांना साकारण्यासाठी एखादे अमूर्त चित्र काढावे किंवा कसलेल्या गायकाने आपल्या स्वरांनी आपले आतले चिंतन खयालातून अमूर्त रुपात मांडावे तशी आपल्या विचारातून, चिंतनातून निर्माण झालेली वैचारिक  अमूर्त जाणीव मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून किरण कुलकर्णी यांनी केला आहे. मराठीत अशा स्वरुपाचा कदाचित पहिलाच प्रयोग असावा. आपण कादंबरी वाचताना ज्या मानसविश्वातून वाचू त्याप्रमाणे त्याचा अर्थ लागत जातो आणि सातत्याने सत्याचा आग्रह धरणारे मन नकळत अनाग्रही बनत या अमूर्त लेखनाचा स्वीकार करते ही या कादंबरीची  ताकद आहे.   या  अनुभवातून   वाचकाने एकदा तरी नक्कीच जायला हवं ...!
   कलाकृतीमधील आशय, विषय, भाषा, शैली आणि कल्पकता हे सर्व पैलू समर्पक ठरुन त्यांनी एकत्रितपणे त्या निर्मितीला एका वेगळयाच पातळीवर नेऊन ठेवले आहे. हया  धाडसी प्रयोगाची तुलना  फ्रान्झ काफ्का, ईतालो काल्वीनो, पॉल ऑस्टर आणि जॉन फॉसे यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या अशा प्रकारच्या लेखनप्रयोगांशी करता येईल. मराठी भाषेतला कादंबरीचा असा अभिनव प्रयोग अभिमानास्पद ठरावा.

 

*********

©2019 by kiran kulkarni. Proudly created by AstronEra

bottom of page